Friday, 5 April 2024

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही .

© चन्द्रहास शास्त्री


षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही

व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .

 

केसांत माळलेली, ती माळ मोगरीची

गंधी नवीन चैती, संध्या समा अशी ही .

 

वाटेतली फुले ही, वाटा करी सुगंधी

माघातली फुले ही, संध्या समा अशी ही .

 

पानांत ही फुलावी, स्वप्ने नवी बहारी

गर्दीत भावनांच्या, संध्या समा अशी ही .

 

आरक्त भावना ही, चित्तात वेधलेली

व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .

  

खेळात खेळते मी ।

 खेळात खेळते मी ।

© चन्द्रहास शास्त्री
वृत्त आनंदकंद 

चन्द्रात शोधते मी, हास्यात शोधते मी ।
राधाच बोलते मी, शब्दी न बोधते मी ।।

कृष्णास शोधते मी, कृष्णास सांगते मी ।
खोटेच का असेना, कृष्णास भांडते मी ।।

त्याचेच गीत कंठी, त्याचेच नाम ओठी ।
थांबून गायचे अन्, वंशीच ऐकते मी ।।

लोकांतही कथांच्या, साथीस मी तयाच्या ।
नामातही तयाच्या, पूर्वीच शोभते मी ।।
 
अद्वैत आमुचे हे, खेळात खेळते मी ।
भक्तांस ठाव ऐसा, त्यांनाच बोधते मी ।।

आनंदकंद कान्हा ।।

 आनंदकंद कान्हा ।।

© चन्द्रहास शास्त्री
वृत्त आनंदकंद 

ओठांत सूर माझ्या, यावा लयीत तेव्हा ।
चंद्रांशु पाझरावा, पाव्यातुनीच कान्हा ।।

अस्तास भानु जाता, हिन्दोळ मानसाचा ।
वेल्हाळ भावनांचा, कल्लोळ होय कान्हा ।।

कान्हाच औषधी अन्, कान्हाच बाधतो हा ।
भेटावया स्वयेची, येई समोर कान्हा ।।

कान्हाच वेद माझा, स्वच्छंद छंद कान्हा ।
कान्हाच वेध माझा, आनंदकंद कान्हा ।।

कान्हाच याग माझा, कान्हाच योग माझा ।
कृष्णास राधिका ही, राधेस वर्य कान्हा ।।

पुन्हा नकोस जाऊ.

 पुन्हा नकोस जाऊ. 

© चन्द्रहास शास्त्री
वृत्त आनंदकंद 

कान्हास काय सांगू, पुन्हा नकोस जाऊ 
येतोस तू कशाला, पुन्हा नकोस जाऊ .

गाऊ किती विराण्या, माझीच एक छाया
ग्रीष्मात रे प्रिया तू, पुन्हा नकोस जाऊ .

शंखात तू दिलेल्या, भावार्त गुन्तलेल्या 
गंधाळती स्मृती या, पुन्हा नकोस जाऊ .

आर्तास माझिया रे, जाणून सांग तू रे
येशील तू कधी रे, पुन्हा नकोस जाऊ .

आता वियोग लाही, गोपीस सह्य नाही
ये एकदा असाही, पुन्हा नकोस जाऊ .

आनंदकंद सारे......!

 


आनंदकंद सारे......!
© चन्द्रहास शास्त्री

शब्दात भावनांना, गुंफायचे कसे रे
भाषेत अक्षरांच्या, बोलायचे कसे रे .

संकेत संचितांचे, आस्वाद्य भाव ऐसे
पानावरी दवाने, कैसे फुलायचे रे .

माथ्यावरी शशीचे, येणे स्वयेच झाले
तारांगणी मनाच्या, कैसे भिजायचे रे .

नाही कुठे कुणाची, खात्री निरभ्रतेची
मौनात बोल काही, कैसे जपायचे रे .

 गद्यात पद्य यावे, तालात गीत गावे
आनंदकंद सारे, कैसे टिपायचे रे .

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...