Sunday, 23 July 2017

वाढते शत्रुत्व जागी तयाचे

वाढते शत्रुत्व जागी तयाचे
⇙ चन्द्रहास सोनपेठकर

मूर्ख नसल्याचे कळते ज्याने,
तितुकेच शहाणपण जगां पूरे l
अधिक ते दिसता शहाणपण
वाढते शत्रुत्व जागी तयाचे ll


दीन नाही कळते ज्याने
तितुकेच धन जगां पूरे l
अधिक ते दिसता धनिकपण
वाढते शत्रुत्व जागी तयाचे ll

जसे असावे तसे माणसाने दिसावे
जितके असावे तितके न दिसावे l
तसे तितके दिसता तरी
वाढते शत्रुत्व जागी तयाचे ll

सुखासी खरे पात्र होई

सुखासी खरे पात्र होई
⇙ चन्द्रहास सोनपेठकर


कुणाचाच कावा कधीही मनाला
कळूनी न यावा बरे माणसाला l
मनी शुद्धता ती रहावी सदा ही
मुखी तेच यावे मनी जे असावे ll

वरी बैसलासे तयां काम काही
असू दे उरू दे करण्यास दंड l
तयां जाण साची असे निश्चिता ही
उगा का करीशी मना तूच बंड ll

तयाच्या स्वभावा स्मरुनी मनात
न चिंता करावी कधीही कशाची l
तयाच्याच पायी नमस्कार साचा
करूनी सुखासी खरे पात्र होई ll

Sunday, 2 July 2017

करीतसे प्रभात श्रीहरी।।

 करीतसे प्रभात श्रीहरी।।

डॉ चन्द्रहास सोनपेठकर

 किती खरे बोलशील मना ।
जगी कसे राहशील मना।।1।।

कागदी फुलांत गंध शोधती।
बेगडी सुरात बोल बोलती।।2।।

सलाम ठोकती खुशाल रे।
मनात पेटती मशाल रे।।3।।

तुला कधी जमायचे मना।
असे लटीक वागणे पुन्हा।।4।।

रहा खराच या जगात रे।
पहा खुशाल सावधान रे।।5।।

करू नकोस काळजी तरी।
करीतसे प्रभात श्रीहरी।।6।।

मला दाखवी बा तुझे रूप गोड़ ॥

 मला दाखवी बा तुझे रूप गोड ॥

डॉ चन्द्रहास सोनपेठकर

 (भुजङ्गप्रयात)
प्रतीक्षा करावी किती रे तुझी मी
हरी विठ्ठला रुक्मिणीच्या वरा रे।
दिला तू मला जन्म भक्ताकुळी रे
पहावी विठोबा किती वाट मी रे।।1॥

जरी माळ कंठी मला घातलीसे
तसे वारक-याकुळी पावलोसे।
तुझी वाट जन्मी सदा पाहतो रे
मनी आस ही दर्शनाची असे रे।।2॥

मला घेतलेसी समीपे परी रे
अजूनी न केलीस आशा खरी रे।
असे विन्मुखी दर्शनासी कसा मी
जप ध्यान तत्त्वैक मानी तुला रे।।3॥

असे चन्द्रहासा मनी एक आस
तुला सांगतो मी तसे जे उरात।
मला दाखवी बा तुझे रूप गोड 
दिसावेस सर्वत्र राया जगात॥4॥

अन जग वैकुंठ दिसावे।।

 अन जग वैकुंठ दिसावे।।

डॉ चन्द्रहास सोनपेठकर 

 
देवा तुझिया शरण म्या यावे
शांत निवांत भाव असावे।
चरणकमली फूले सुगंधी
त्या गंधात म्या विरूनी जावे।।

नकोच उरणे अन माघारी फिरणे
तुला बघून सारे मोह सुटावे।
नकोच पुन्हा लटके लटकणे
तुला पाहून कैवल्य स्मरावे।।

काय इथे आणिक काय तिथे
हृदयी तू राहण्यास यावे।
तुझेच सगुण रूप ते हे हे ते
अन जग वैकुंठ दिसावे।।

चालावे हळु परी---!

 चालावे हळु परी---!

डॉ चन्द्रहास सोनपेठकर


चालावे हळु परी
कोणास दुखवू नये।
बोलूनी खोटे पुन्हा
कोणास सुखवू नये॥

कौशल्य अंगी असता
गर्वाने वागू नये।
लटकी करी प्रशंसा
लबाडास जोडू नये॥

खलासी कधीही कोठेही
शरण जाऊ नये।
भक्ती नारायणाची कदा
माणसाने सोडू नये॥

नमस्कार माझा तुला रेणुकेला।।

नमस्कार माझा तुला रेणुकेला।।

(वृत्त: भुजङ्गप्रयात ) 

वहावा उगा भार का तो शिरी हो
करावी कशाला उगा काळजी हो।
कृपा अंबिकेची हवी माणसाला
समर्था कृपा होत चिंता कशाला॥1॥

सुटे सर्व कोडे क्षणांती तदा हो
कृपाछत्र जेव्हा तुझे लाभते हो।
मही आणि आकाश पाताळ मध्ये
तुझा सर्व लोकांत डंका सदा हो॥2॥

शरण्याम्बिका तू तुला मागता हो
मिळे सर्व काही सुखाने सुखाने।
विपत्तीत मार्गां स्वयें धाडिशी तू
नमस्कार माझा तुला रेणुकेला॥3॥

जसे खड्ग हाती धरूनी शिवे तू
सुरां रक्षिले पूर्वकाली सदा हो।
तसे आज ही लेकरां रक्षिसी तू
नमस्कार माझा तुला रेणुकेला॥4॥

तुला प्रार्थिता हो मिळे इष्ट सर्व
तुला प्रार्थिता हो पळे कष्ट दूर।
तुला वंदिता हो मिटे ताप सारा
नमस्कार माझा तुला रेणुकेला॥5॥

मला पामराला तुझी भक्ति देई
नितांता अगाधा अशी भक्ति देई।
स्मरावे मला नाम आई तुझे हो
नमस्कार माझा तुला रेणुकेला॥6॥
© चन्द्रहासः।

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...