Sunday, 2 July 2017

नमस्कार माझा तुला रेणुकेला।।

नमस्कार माझा तुला रेणुकेला।।

(वृत्त: भुजङ्गप्रयात ) 

वहावा उगा भार का तो शिरी हो
करावी कशाला उगा काळजी हो।
कृपा अंबिकेची हवी माणसाला
समर्था कृपा होत चिंता कशाला॥1॥

सुटे सर्व कोडे क्षणांती तदा हो
कृपाछत्र जेव्हा तुझे लाभते हो।
मही आणि आकाश पाताळ मध्ये
तुझा सर्व लोकांत डंका सदा हो॥2॥

शरण्याम्बिका तू तुला मागता हो
मिळे सर्व काही सुखाने सुखाने।
विपत्तीत मार्गां स्वयें धाडिशी तू
नमस्कार माझा तुला रेणुकेला॥3॥

जसे खड्ग हाती धरूनी शिवे तू
सुरां रक्षिले पूर्वकाली सदा हो।
तसे आज ही लेकरां रक्षिसी तू
नमस्कार माझा तुला रेणुकेला॥4॥

तुला प्रार्थिता हो मिळे इष्ट सर्व
तुला प्रार्थिता हो पळे कष्ट दूर।
तुला वंदिता हो मिटे ताप सारा
नमस्कार माझा तुला रेणुकेला॥5॥

मला पामराला तुझी भक्ति देई
नितांता अगाधा अशी भक्ति देई।
स्मरावे मला नाम आई तुझे हो
नमस्कार माझा तुला रेणुकेला॥6॥
© चन्द्रहासः।

No comments:

Post a Comment

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...