Friday, 28 April 2023

कृष्ण राधा कदंबी

 


कृष्ण राधा कदंबी
- चन्द्रहास (हासरा चंद्र)
वृत्त- भुजंगप्रयात


सरळ अर्थाने 'सुबोध' असणारी आणि व्यंग्यार्थाने 'बोध' व्यक्त करणारी अशी ही कविता अशातच श्रीराधावल्लभाने करवून घेतली. तव नारायण, तुभ्यमेव समर्पये ।



सुधीरा, धरी धीर सांगे धरा ही
मनाचे मनालाच ठावे असे हे
नको शोधणे ते असे जे समीपे
करी मान्य ते रे जसे जे स्वरूपे

गुलाबी फुलांच्या गुलाबीच गप्पा
वसे अंतरी आपुला एक कप्पा
मनी अंगणी बोलवावे कसे रे
 समीपे तया आठवावे कसे रे
 
मनातील सारे कसे ओघळावे
दवांचे जसे थेंब पानी रुळावे
इथे थांबलेला कसे मी वळावे
तुझे बोलणे गे कसे आकळावे

तुला सर्व ठावे कसे मी वदावे
फुलाने फुलाला कसे गंधवावे
सुराच्या लयीने कशाला स्रवावे
सरातील पाण्यात ओलेच व्हावे

तुला राधिके मी कसे न्याहळावे
अभिन्ने प्रिये तू मला ओळखावे
इथे द्वैत येईल कामास आता
इथे मुग्ध होईल अद्वैत आता


No comments:

Post a Comment

संध्या समा अशी ही .

संध्या समा अशी ही  . © चन्द्रहास शास्त्री षट्पाद बद्ध कोशी, संध्या समा अशी ही व्याधी नवी नवी ही, संध्या समा अशी ही .   केसांत माळलेली,...