- चंद्रहास सोनपेठकर
पुस्तकांचंही असतं आपलं व्यक्तिमत्व
पुस्तकांचंही असतं आपलं असं गाव
काही पुस्तकं चिरंतन स्मरणात राहतात
तर काही पुस्तकं नित्य सोबती जीवनात
आठवतात पुस्तकामधून आलेली पत्रं ?
पुस्तकाला साक्षी ठेऊन दिलेली वचनं?
आठवतात पुस्तकामधील व्यक्तिचित्रं?
पुस्तकाला साक्षी ठेऊन रंगवलेली स्वप्नं?
लेखन, वाचन, समीक्षण प्रक्रिया असतात तीन
पुस्तक एकच, आपण व्हावं त्याच्यातच तल्लीन
रसास्वाद घ्यावा, फार काथ्याकूट न करताच
उगा प्रशंसा करू नये, पुस्तक मनात न भरताच
अलंकारांचा ताल असतो, अर्थाचा आलाप असतो.
भाषेची एक लय असते, पुस्तकात संगीत असतं.
पुस्तकाला गंध असतो, त्याचा स्थायीभाव असतो.
एक स्वत:ची शैली असते, ओंजळभर जीवन असतं.
एखादं पुस्तक असं असतं की, आपल्याला पसंत नसतं
एखादं पुस्तक असंही असतं की, ते आपल्यासाठी नसतं.
एखाद्या पुस्तकात नसतो वसंत, एखादं निव्वळ कृत्रिम असतं
एखादं पुस्तक असं असतं की, ते पद्य असतं नि गद्य भासतं.
आवडलेलं पुस्तक निवडण्याचं, करता येतं धाडस
माणसाला असं स्वातंत्र्य, पुस्तकात तर मिळत असतं.
काही पुस्तकं अशी छान असतात, जणू हरणाचं पाडस
हृदयातच साठवावं, एखादं पुस्तक इतकं छान असतं.
तू पुस्तक लिहितोस, छान!
तू वाचतोस, अजूनच छान!
तू वाचून ओला होतोस, छान!
तू ओला होत जगतोस, छानच!

No comments:
Post a Comment